येवला : येथून ५ किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिरानजीक, कृष्णा एन्झीटेक कंपनीच्या वळणावर शिर्डी येथील साईबाबा संस्थानची बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत १२ साईभक्त जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. जखमींत ७ पुरुष, ४ महिला तसेच चार बालकांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश येथील रहिवाशी असलेल्या ३२ साईभक्तांना सोमवारी रात्री ९ वाजेच्या अजंता एक्स्प्रेसने नगरसूल येथून परतीच्या प्रवासाला जायचे होते. साईबाबा संस्थानची एमएच-१७ एजी ९७४७ या क्रमांकाच्या बसने चालक आप्पासाहेब रक्ताटे ३२ साईभक्तांना घेऊन शिर्डीहून नगरसूल रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी सहा वाजता निघाले. दरम्यान सांयकाळी सातच्या सुमारास ही बस येवल्यानजिक म्हसोबा मंदिराजवळील कृष्णा एन्झीटेक कंपनीच्या वळणावर आली. त्याच सुमारास कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचे टायर फुटल्याने तो बसवर आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की, बसवर आदळल्यानंतर तो ५०० मीटर अंतरावरील काटवनात जावून पलटी झाला. या धडकेत चालकाच्या बाजूने बसलेले १५ प्रवाशी जखमी झाले. या जखमींना तत्काळ येवला येथील ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रु ग्णालयात हलविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह सौरभ कुलकर्णी, निलेश कुमावत, पप्पू पाटोळे, अनिल शिनगर, सागर वाडेकर व सहकाºयांनी मदत कार्य केले. दरम्यान कंटेनर चालक कंटेनर चालक भगवान कुंभार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
येवल्याजवळ बस अपघातात १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:03 AM