नाशिक : सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव-कोडीपाडा घाटातून राक्षसभुवन गावाकडे जात असताना एका प्रवासी जीपचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे जीप थेट घाटातून दरीत कोसळून १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २२) बाऱ्हेजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गायकवाड कुटुंबीय ठाणगाव येथे एका दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून जीपने (एमएच १५ एएस ७२५६) राक्षसभुवन गावाकडे जात होते. दरम्यान, ठाणगाव-कोडीपाडा घाट उतरत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे जीपचे ब्रेक निकामी झाल्याने चालक राजेंद्र पंढरीनाथ गायकवाड (३५, रा. देवसाने) यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे जीप थेट दरीत कोसळली. जीपचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, सुमारे पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी जीपच्या पुढे काही नातेवाईक दुचाकीने जात होते, त्यांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अन्य लोकांना थांबवून मदत घेत सर्व जखमींना दरीतून वर आणले तसेच अपघाताची माहिती पोलिसांना कळविली. जखमींची संख्या जास्त असल्याने राज्य शासनाची वैद्यकीय सेवा देणाऱ्या १०८ टोल फ्री क्रमांकाच्या चार रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. अपघात गंभीर स्वरूपाचा होता; मात्र दैव बलवत्तर असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकासह एकूण पंधरा प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जीप दरीत कोसळून १५ जखमी
By admin | Published: April 23, 2017 1:52 AM