आमदार नितीन पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी,
वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या यंत्रणेला सूचना
कळवण : कोरोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठलेही गैरसमज, अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, ज्या ग्रामपंचायत हद्दीत १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण होईल त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुका दौऱ्यात केली.
तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेसमवेत नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन आदिवासी बांधवांना दिलासा दिला. चक्रीवादळामुळे घरांचे तसेच आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला देऊन पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन अहवाल शासनस्तरावर सादर करण्याची सूचना यावेळी आमदार पवार यांनी केली. सुरगाणा तालुक्यातील सुकतळे, हस्ते, सांबरखल,बरडा,दाबाडमाळ ,रोंगाणे,म्हैसमाळ, शिरीषपाडा,दांडीचीबारी, वडपाडा, माणी, खडकमाळ, पळसन, म्हैसखडक, देविपाडा, उंबरठान, मांधा पांगारणे, गोंदूणे आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त घर व फळबाग यांना भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
या आदिवासी बहुल भागातील दौऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली का याबाबत अनेक आदिवासी बांधवांना त्यांनी विचारणा केली. अनेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आले. लसीकरणाबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात आल्या असून मी स्वतः लस घेतली आहे त्यामुळे गैरसमज करुन न घेता लसीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी ठिकठिकाणी केले.
यावेळी दौऱ्यात सुरगाणा तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रणवीर, तालुका कृषी अधिकारी रहाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, प्रमुख पदाधिकारी व नुकसानग्रस्त भागातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो -
सुरगाणा तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतांना आमदार नितीन पवार समवेत तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रणवीर, तालुका कृषी अधिकारी रहाणे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार आदी.