नाशिक : चार महिन्यांपूर्वीच नाशिक तालुक्याच्या तहसिलदार पदाची सुत्रे हाती घेतलेल्या संशयित नरेशकुमार बहिरम (४४,रा.कर्मयोगीनगर) यांच्यावर लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.५) संध्याकाळी कारवाई केली. तक्रारदाराकडून १५ लाख रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने संशयित बहिरम यांना ताब्यात घेतल्याची माहिती अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.
नाशिक महसूल विभागाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मोठ्या कारवाईने पुन्हा दणका दिला आहे. राजुरबहुला गावातील तक्रारदाराकडून जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन, जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० याप्रमाणे दंड आकारणीचे आदेश जिल्हा प्रशासनाने तहसिलदार बहिरम यांना दिले होते. बहिरम यांनी याबाबत जमिन मालकाला नोटीस बजावली. त्यानंतर तक्रारदार जमिन मालकाने याबाबत नाशिकचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आदेशाविरूद्ध अपील दाखल केले. यावर सुनावणी होऊन त्यांनी याप्रकरणी फेरचौकशीचे आदेश देत प्रकरण बहिरम यांच्याकडे पाठविले होते. जमिनीतून उत्खनन केलेल्या मुरूमाचा वापर त्याच जागेत करण्यात आल्याचे तक्रारदार याने नमूद केलेले होते. यामुळे पडताळणी करण्याकरिता जमिनी मालकाला त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथील जागेवर स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते. जमिन मालक हे आजारी असल्यामुळे तक्रारदार यांस त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईकामी अधिकारपत्र दिल्याने त्यांनी निरिक्षणावेळी हजेरी लावली. यावेळी संशयित बहिरम यांनी तडजोडअंती १५ लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.
पडताळणी पंचनामा करण्याचे मान्य करत लाच स्वीकारण्याचे संशयित बहिरम यांनी मान्य केले. लाचेची रक्कम त्यांनी शनिवारी स्वीकारली असता अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वये अपर अधीक्षक माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांनी पथकाला सूचना केल्या. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, स्वप्नील राजपूत, गणेश निबांळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी संशयित बहिरम यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.