घोटी : विधानसभा निवडणूक जोर धरीत असताना निवडणूक विभागाच्या स्थायी निगराणी पथकाने घोटी टोलनाक्यावर संशयास्पद वाहनातून ८ लाख ८३ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ५ आणि १० रु पयांच्या नाण्यांची एकूण रक्कम ८३ हजार आहे. स्थायी निगराणी पथकाने नाणी आणि रोख रक्कम इगतपुरी येथील उपकोषागार कार्यालयात जमा केली आहे.विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता वाढत चालला आहे. काळा पैसा आणि मद्याचा साठा यावर लक्ष दिले जात आहे. निवडणूक यंत्रणेचे स्थायी निगराणी पथक अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील टोलनाक्यावर तैनात आहे. पथकप्रमुख पगारे यांनी मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या संशयित वाहनाची (क्र.एमएच ०५ सीएम ८६२०) तपासणी केली. यामध्ये ५०० रुपयांच्या १६०० नोटा अशी ८ लाखांची रक्कम, ५ आणि १० रु पयांची ८३ हजारांची नाणी अशी एकूण ८ लाख ८३ हजारांची रोख रक्कम आढळून आली.वाहनचालक अनिलकुमार शिंदे, मालक सुनील हजारी यांना या रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आली नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली. स्थायी निगराणी पथकप्रमुख पगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवचरण कोकाटे, पोलीस कर्मचारी पुंडलिक बागुल, विलास धारणकर, कॅमेरामन अमित बोधक यांनी ही धडक कारवाई केली.रक्कम कोषागारात केली जमाजप्त केलेल्या रकमेत ८३ हजारांची नाणी असल्याने त्यांची मोजदाद करताना सर्वांची दमछाक झाली. संपूर्ण रक्कम पंचनामा करुन इगतपुरी येथील उपकोषागार अधिकारी अण्णासाहेब भडांगे यांच्या ताब्यात देण्यात आली.
घोटी टोलनाक्यावर ८.८३ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 2:01 AM