सिन्नर : रात्रीच्या वेळी लघुशंकेला उठलेल्या ज्येष्ठाची नजर चुकवून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील दाग-दागिन्यांसह दीड लाखाच्या ऐवजावर चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील देवपूर येथे शनिवारी (दि.११) रोजी रात्री घडली. नाशिक सहकारी साखर कारखान्याहून सेवानिवृत्त झोले तुळशीराम रंगनाथ गडाख आपल्या कुटूंबियासंह देवपूर-खोपडी रस्त्यावरील मळ्यात राहतात. शनिवारी रात्री ते पत्नीसह घरात झोपले होते. तर त्यांचे नातू घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडीत झाला आणि गडाख दरवाजा उघडून लघूशंके साठी घराबाहेर आले. ही संधी साधत चोरटा त्यांच्या घरात शिरला. गडाख घरात आले आणि दरवाजाला आतून कडी लावून पुन्हा झोपी गेले. त्यानंतर गडाख यांच्या कोपरीच्या खिशातील कपाटाची चावी व अंधारात उजेडासाठी उशाशी ठेवलेली बॅटरी याचा वापर करून चोरट्याने गडाख यांच्या कपाटातील दागिने व रोख पैशावर डल्ला मारला. गडाख यांनी तीन-चार दिवसांपूर्वी आपल्या शेळ्या विकून आलेले २०-२२ हजार रूपये कपाटात ठेवले होते. तर पत्नीची सोन्याची एक दानी पोत व लहान मुलांच्या अंगावरील दागिने असे सहा तोळे सोन्याचे दागिने पर्ससारख्या रेग्झिनच्या पिशवीत ठेवले होते. ही पिशवी घेवून चोरटा घराची आतली कडी उघडून घराबाहेर आला. रस्ता शोधन्यात अडचण येवू नये म्हणून बॅटरी सोबत नेली. घरापासून काही अंतरावर चोरट्याने आधारकार्ड व कागदपत्रे तिथेच अस्ताव्यस्त फेकून दिले. सकाळी उठल्यावर कपाट उघड दिसल्यानंतर गडाख यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वांना आवाज देवून बोलावले. भांबावलेल्या गडाख यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांनी कपाटात सर्व दागिने पैसे आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी कपाटाची उचकापाचक केली. घराबाहेर काही सापडेल का पाहण्यासाठी फिरत असताना पिशवी व इतर ओळखपत्र त्यांना सापडली. पिशवीसह सर्वच उचलून त्यांनी घरी आणले. त्यानंतर चोरीची घटना पोलिसांना कळवण्यात आली. मात्र, घरातील कपाटासह सर्वच वस्तू सर्वानीच हाताळल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. श्वान पथक बोलावले तरी चोरट्याचा माग काढणे त्यामुळे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
देवपूर येथे दीड लाखाचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 3:17 PM