सिन्नर : तालुक्यातील कणकोरी येथे ३८ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील १५ जणांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे स्राव घेण्यात काम सुरू होते. दरम्यान, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० जणांना होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील युवक मुंबई येथे केटरिंग कामानिमित्त होता. तो १० तारखेला कणकोरी व नांदूरशिंगोटे येथे आला होता. त्यावेळी तो अनेकांच्या संपर्कात आला.दरम्यान, त्यास ताप आल्यानंतर नांदूरशिंगोटे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १५ तारखेला त्याला सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.१७) सदर रुग्णाची कोरोना चाचणी पॉझटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला.तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रंजित गलांडे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी नांदूरशिंगोटे व कणकोरी येथे जाऊन आले.कणकोरी येथील आरखडी चारी नंबर २ चा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांना सिन्नरला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित ३३ जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.------------------------------आरोग्य विभागाच्या दोन टीम दररोज ७० घरांचा सर्व्हे करणार आहेत. ४०२ लोकसंख्या असणाऱ्या भागात दररोज सर्व्हे केला जाणार असून, दापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेबांरे लक्ष ठेवून असणार आहेत.
कणकोरीच्या रुग्णाच्या संपर्कातील १५ क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 9:57 PM