लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात जून २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीकरिता संबंधित वास्तुविशारद, अभियंता व सुपरवायझर यांना नगररचना विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक असून, आजपावेतो जवळपास १५० वास्तुविशारद व ३० अभियंता यांनी या प्रणालीमध्ये नोंदणी केली असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली आहे. नगररचना विभागाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नगररचना विभागामार्फत इमारत विकसन परवानगी, अभिन्यास परवानगी व भोगवटा दाखला मंजूर करण्यात येतात. नाशिक शहराचा भागश: विकास आराखडा आणि विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार नागरिकांना जलदगतीने व आॅनलाइन पद्धतीने विकसन परवानग्या मिळाव्यात तसेच त्याबाबतची कार्यपद्धती ही पारदर्शक असावी या उद्देशाने आयुक्तांनी नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आॅटो डीसीआर प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नगररचना विभागास आदेशित केले होते, त्यानुसार निविदाप्रक्रि या राबवून दिनांक १ जून २०१७ पासून आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यासाठी मे.सॉफ्टटेक इंजिनिअरिंग प्रा.लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आॅटो डीसीआर प्रणाली लागू होण्यापूर्वी संबंधित संस्थेमार्फत नगररचना विभागातील सर्व अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तसेच वास्तुविशारद व अभियंता यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊन त्यांना याबाबतच्या कार्यपद्धतीबाबत अवगत करण्यात आलेले आहे. दिनांक १ जूनपासून नगररचना विभागाकडे दाखल होणारे सर्व नवीन बांधकाम परवानगी प्रस्ताव आॅटो डीसीआर कार्यप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येत असून, आजपावेतो ३१ बांधकाम परवानगी प्रस्ताव नगररचना विभागाकडे आॅटो डीसीआरप्रणालीद्वारे दाखल झालेले आहेत. या प्रणालीद्वारे प्रथम बांधकाम परवानगी मंजूर करून निर्गमितही करण्यात आलेली आहे.
‘आॅटो डीसीआर’ प्रणालीसाठी १५० वास्तुविशारदांची नोंदणी
By admin | Published: July 14, 2017 11:59 PM