नाशिक : दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. तेथे मुक्काम केल्यानंतर रायकांनी उंटांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) राजस्थानच्यादिशेने प्रवास सुरू केला. सोमवारी (दि.२९) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी शहर ओलांडल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली. अबुरोडने हे उंट मरूभुमी सिरोही गाठणार आहे. यासाठी अजून दहा ते बारा दिवसांचा प्रवास करत सुमारे ५००किमीचे अंतर कापावे लागणार असल्याचे रायकांनी सांगितले.
दहा दिवसांपुर्वी शुक्रवारी (दि.१९) निघालेले ९५ उंट आणि रविवारी मालेगावातून निघालेले ५३ उंट धरमपूरमध्ये पोहचले. तेथे दोन दिवसांचा मुक्काम केला. दरम्यान, सिडकोच्या मंगलरूप गोशाळेत असलेले तीन उंटांनाही शुक्रवारी ट्रकमधून धरमपूरला पोहचविण्यात आले. त्यानंतर उंटांनी पुढे प्रवास आरंभ केला. सुमारे १५०उंटांचा हा कळप गुजरात राज्यातून सध्या मार्गस्थ होत आहे. यासाठी वलसाड जिल्हा पोलिसांसह सुरत व पुढे मांडवी आणि जुनागढ जिल्ह्यातील जमखा पोलिसांकडून बंदोबस्त देण्यात येत आहे. गुजरात राज्यातील कच्छ, जुनागढ, नर्मदा, वडोदरा, अहमदाबाद पोलिसांकडून दंतेवाडा आमिरगडपर्यंत उंटांना ‘एस्कॉर्ट’ केले जाणार आहे. आमिरगडपासून पुढे राजस्थान पोलिसांकडून बंदोबस्त पुरविला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
...असे गाठणार सिरोही!मांडवी-जमखा-राजपिपला, वडोदरा, अहमदाबाद, बनासकाठा, दंतेवाडा, अमिरगड, अबुरोड, स्वरुपगंज, पिंडवाडामार्गे दक्षिण राजस्थानातील सिरोहीमध्ये दाखल होणार आहे. सुमारे ५००किमीचे हे अंतर कापण्यासाठी अजुन दहा ते बारा दिवसांचा पायी प्रवास उंटांना करावा लागणार आहे. महाविर कॅमल सेन्च्युरीद्वारे या उंटांचे पुनर्वसन केले जाणार आहे.