कळवण : तालुक्यातील नांदुरी येथील कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थींच्या पहिल्या व दुसरा हप्त्याच्या आलेल्या निधीतून २५ हजार रुपये पीक कर्ज खात्यात वर्ग करून घेतल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे काम रखडले आहे.काम पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न आता दिवास्वप्न ठरू पाहत आहे. घरकुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आलेल्या निधीतील १५ हजार रु पयांचा निधी कॅनरा बँकेने तत्काळ खात्यात वर्ग करावा, अशी मागणी घरकुल लाभार्थी सुखला सुरेश गवळी यांच्यासह अन्य लाभार्थींनी केली आहे. या प्रकरणी लाभार्थींनी पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधून घेत कॅनरा बॅँकेविरोधात तक्रार नोंदविली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींच्या घरकुलाच्या कामासाठी अनुदान स्वरु पात आलेला निधी पीक कर्ज खात्यात जमा केल्याने खात्यात पैसाच शिल्लक नसल्याने त्यांच्या घराचे काम रखडले आहे. घरकुलाचे काम सुरू झाल्याने आदिवासी लाभार्थींनी त्यांचे जुने कुडाचे झोपडेवजा घरे पाडली. आज संसार उघड्यावर आला आहे. उर्वरित घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी हक्काचा निधी मिळविण्यासाठी बेघर झालेल्या आदिवासी लाभार्थींवर पंचायत समिती व कॅनरा बँकेचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. घरकुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कॅनरा बँकेतील खात्यावर जमा झालेला निधी पीक कर्ज खात्यात जमा न करता तत्काळ अदा करावा, अशी मागणी लाभार्थी सुखला गवळी, सुभाष रघुनाथ भोये, धनराज कारभारी कुवर यांनी गटविकास अधिकारी बहिरम यांच्याकडे केली आहे. या योजनेचा निधी बॅँकेला अथवा लाभार्थीला दुसºया कामासाठी वापरता येणार नाही. पंचायत समिती स्तरावरून बँकेच्या शाखाधिकायांशी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्कहोऊ शकला नाही. बँकेशी पत्रव्यवहार करून घरकुलाचा निधी तत्काळ लाभार्थींना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.- डी. एम. बहिरम, गटविकास अधिकारी, कळवण
घरकुलाच्या हप्त्यातून पीक कर्जात १५ हजार वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:19 AM