पुरुषोत्तम राठोड घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा.लि. कंपनीमध्ये बॉयलर स्फोटामुळे अग्नितांडव घडले. रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २ कामगार ठार, तर १७ जण गंभीर जखमी झाले. मृतात दोन्ही महिलांचा समावेश आहे. तब्बल १५ ते १६ स्फोट झाल्याने हा परिसर हादरला. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
कारखान्यातील पॉलीफायर प्लांटला भीषण आग लागली. आग पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाक्यांपर्यंत पोहोचल्याने आगीने भडका घेतला. स्फोट होऊन त्याचे जोरदार हादरे सुमारे दहा किलोमीटर पर्यंतच्या गावांमध्ये जाणवले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तब्बल १५ ते १६ स्फोट झाले. रात्री उशिरापर्यंत या आगीचे लोळ दिसत होते.
बॉयलरचे सेफ्टी टॅन्क न उघडल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. बहुतांश कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय आश्रमशाळेत स्थलांतरित केले आहे. तसेच कस्तुरबा गांधी शासकीय आश्रमशाळेतील मुलींनाही अन्यत्र हलविले आहे.
मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत घटनेचे वृत्त कळताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या सिल्लोड येथील कार्यक्रम आटोपता घेत इगतपुरी गाठले. घटनास्थळाची पाहणीनंतर जखमींची भेट घेतली. मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.