नाशिक : अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्यांसह एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, अशाप्रकारे चार फेऱ्यांमध्ये आतापर्यंत १६ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत, तर दुसऱ्या विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील नवीन वर्षात शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या प्रवेश प्रक्रियेनंतर ८ हजार ६६२ जागा अजूनही रिक्त असून, या रिक्त जागांसाठी दुसरी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.
नाशिक शहरातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या २५ हजार २७० जागा आहेत. त्यापैकी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित तीन फेऱ्यांसह एका विशेष फेरीत १६ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत, तर ८ हजार ६६२ जागा अजूनही रिक्त आहेत. विशेष फेरीत ४ हजार ९१० विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रथम पसंतीच्या जागांचे वाटप करण्यात आले होते, त्यापैकी ३ हजार ७६१ प्रवेश निश्चित झाले होते. विशेष कोट्यातील ५५८ प्रवेश झाले आहेत. दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश रद्द केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.