नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल विक्रीवर मर्यादा आणूनदेखील दुचाकींचा वापर सर्रास सुरूच असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी थेट तीन महिने जप्त करण्याचे आदेश काढले आहेत. या तीन दिवसांत तब्बल 162 दुचाकी शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आल्या आहेत. सदर दुचाकीमालकांना पुढील तीन महिन्यांकरिता आपल्या दुचाकीला मुकावे लागणार आहे.
‘कोरोना’चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह कलम- १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी पोलीस करत आहेत. नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३४ जाॅगर्स ला पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्कालीन व अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, काही हौशी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून दिवस उजाडताच ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने घराबाहेर पडले होते. हेच नागरिक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. जॉगर्सविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सर्वच पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.
शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. गेल्या दोन दिवसांत गंगापूर पोलिसांत २९, उपनगर पोलिसांत २ तर देवळाली कॅम्प पोलिसांत ३ असे एकूण ३४ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, ज्या भागात सकाळी नागरिक फेरफटका मारताना दिसतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. तसेच, रात्री जेवणानंतर शतपावली करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. गस्तीवर असलेल्या विशेष पथकांना जॉगिंग ट्रॅकसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.-----६५९ नागरिकांवर कारवाईदेशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिससांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरात ६५९ नागरिकांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी असेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
‘कोराेना पोलीस मदत कक्ष’ सज्जशहर पोलीस आयुक्तालयामार्फत संचारबंदीत जीवनावश्यक व इतर सेवासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मदतीसाठी ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’ कार्यरत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना काेरोना कक्षासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.