नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाईन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालये व विद्याशाखा निवडण्यासाठी ऑनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याच्या प्रक्रियेची अंतिम प्रक्रिया संपुष्टात आली असून, रविवारी (दि. २२) सायंकाळी मुदत संपेपर्यंत सुमारे १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी पसंतीचे पर्याय निवडून ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीसाठी सोमवारी (दि.२३) तात्पुरती, तर मंगळवारी (दि.२५) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार यापूर्वी नोंदणी करीत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळपर्यंत अर्जाचा भाग दोन भरतानाच पसंतीचे महाविद्यालय व विद्याशाखांचे पर्याय निवडून ऑप्शन फॉर्मही भरले आहेत. नाशिक शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या २५ हजार ३८० जागांसाठी आतापर्यंत २१ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करीत ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरून निश्चित केला आहे. यातील १८ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची पडताळणी केली असून, १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालये व विद्याशाखांचे पर्यायही निवडले आहेत. पर्याय निवडून ऑप्शन फॉर्म सबमीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोमवारी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
चौकट :
अकरावी प्रवेशाची सद्य:स्थिती
महाविद्यालये- ६०
जागा - २५, ३८०
नोंदणी- २१,६८८
लॉक अर्ज- १९,१८०
पडताळणी- १८,८५२
पर्याय निवडून भाग दोन सबमिट- १६,३७५