नाशिक - थकीत घरपट्टी प्रचंड प्रमाणात असल्याने महापालिका आयुक्तांनी आता विभागीय अधिकाऱ्यांना मासिक १७ कोटी रुपये थकबाकी वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे नियमित घरपट्टीबराेबरच आता ही रक्कम देखील वसूल करावी लागणार आहे.
नाशिक महापालिकेची थकीत घरपट्टी सुमारे साडेचारशे कोटींवर गेली होती. गेल्या आर्थिक वर्षात त्यातील सुमारे पन्नास कोटी रुपये वसूल केल्याचे सांगण्यात येते. मात्र, उर्वरित थकबाकीही मोठ्या प्रमाणात असल्याने आयुक्तांनी आता थकबाकी वसुलीसाठी आतापासूनच प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यामुळे प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये पंचवटी विभागासाठी ३ कोटी ७२ लाख, पूर्व विभागासाठी ३ कोटी २९ लाख रुपये, सिडकाे विभागासाठी २ कोटी ९३ लाख, नाशिकरोड विभागासाठी २ कोटी ९८ लाख, नाशिक पश्चिम विभागासाठी २ कोटी ४९ लाख, सातपूर विभागाच्या थकबाकी वसुलीसाठी १ कोटी ६२ लाख रुपये, याप्रमाणे प्रति महिना सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी मिळून १७ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.