मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव १७ विरुद्ध १ अशा बहुमताने मंजुर झाला आहे. हिरे यांच्या विरोधात तालुक्यातील कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना व भाजपाच्या संचालकांनी एकत्र येत हा अविश्वास ठराव मंजुर केल्याने तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.सभापती हिरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत सभापती पदाचा गैरवापर करतात. तसेच आडते असोसिएशनला कार्यालयासाठी आवारात बेकायदेशीरित्या जागा दिली आहे, राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड थकली आहे. सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज केले जात आहे. यासह इतर चार मुद्यांवर शिवसेना, भाजपाच्या संचालकांनी गेल्या ४ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान घेण्यासाठी सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी दाखल झालेल्या अविश्वास ठरावाचे वाचन करण्यात आले. यानंतर चर्चा करण्याची सूचना मोरे यांनी केली. यावेळी सभापती हिरे यांनी अविश्वास ठरावात दाखल केलेले आरोप खोटे आहेत असा खुलासा केला. यानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी उपसभापती सुनिल देवरे, संचालक अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव, पुंजाराम धुमाळ, राजाभाऊ खेमनार, संजय निकम, राजेंद्र जाधव, अमोल शिंदे, गोविंद खैरनार, सोजाबाई पवार, बबीता कासवे, गोरख पवार, सुमन निकम, संग्राम निकम, संजय घोडके, शेख फकीरा अहमद शेख सादीक, वसंत कोर आदि शिवसेना- भाजपाच्या १७ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. त्यामुळे बैठकीचे अध्यक्ष मोरे यांनी १७ विरुद्ध १ मताने अविश्वास ठराव मंजुर झाल्याचे जाहीर केले.
मालेगाव सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजुर, शिवसेना-भाजपाचे १७ संचालक एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:58 PM