नाशिक : लोकसंख्येचा वाढता विस्फोट रोखण्यासाठी ‘हम दो, हमारे दो’ या शासनाने एकेकाळी राबविलेल्या संकल्पनेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्यामुळे लोकसंख्येचा आलेख कायम चढताच राहिल्याचे पाहून शासनाने आता निव्वळ घोषवाक्याच्या माध्यमातून लोकसंख्या आटोक्यात आणण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या विविध योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १५ ते ३९ या वयोगटातील दाम्पत्यांचा शोध घेऊन त्यांच्याच लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचा त्याचबरोबर प्रत्येक आरोग्य केंद्रात ‘कुटुंब कल्याण कोपरा’ ही अभिनव संकल्पना राबवून शासकीय रुग्णालयात पहिल्यांदा प्रसूत होणाऱ्या सुमारे २५ टक्के महिलांना तत्काळ ‘कॉपर टी’ बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने २७ जून ते १० जुलै दरम्यान ‘दाम्पत्य संपर्क पंधरवडा’ आयोजित करून या काळात १५ ते ३९ या प्रजननाची क्षमता असलेल्या वयोगटातील दाम्पत्यांशी संपर्क साधला. जिल्ह्यात ही संख्या १०,६०,४४४ इतकी असून, साधारणत: एक हजार जोडप्यामागे १५ ते १७ टक्के जोडपे प्रजननासाठी तयार असले तरी, त्यातील ६० टक्के जोडपे गर्भरोधक साधनांचा वापर करतात व ४० टक्के जोडप्यांना त्याची कल्पना नसल्याचे आढळून आले आहे. अगदी आकडेवारीतच सांगायचे झाल्यास जिल्ह्यात प्रजनन क्षमता बाळगून असलेल्या एकूण दाम्पत्यांपैकी ४,४०,६७४ जोडपे गर्भरोधक साहित्याचा वापर करतात व १,९९,७७० जोडप्यांना त्याची माहितीच नाही. आरोग्य खात्याने नेमके याच जोडप्यांना टार्गेट केले आहे. या जोडप्यांची माहिती आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य खात्याकडे पोहोचल्यामुळे ११ ते २४ जुलै या काळात अशा जोडप्यांना निरोध व गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. एका जोडप्याला दहा निरोधाचे पाकीट तसेच एक गर्भनिरोधक गोळ्याचे पाकीट देण्यात येणार आहे. या साहित्याच्या वाटपातून लोकसंख्येला काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा आरोग्य खात्याला आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी जिल्ह्यातील १०४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘कुटुंब कल्याण कोपरा’ अशी नवीन संकल्पना या काळात राबविण्यात येणार आहे. त्यात ्रप्रामुख्याने प्रत्येक आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात कुटुंब कल्याणासाठी उपयुक्त ठरणारी साधने, साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक साहित्याचा वापर, लाभ याची माहिती दिली जाणार आहे. जनजागृतीच्या माध्यमातून लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्याबरोबरच प्रत्यक्ष कृतीतूनही या वाढीला चाप लावण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याचे आहे. त्यात प्रामुख्याने पहिल्यांदा प्रसूतीनंतर तीन महिन्यांत पुन्हा स्त्री गर्भवती राहात असल्याने लोकसंख्या वाढीचा धोका तर आहेच, परंतु स्त्रीच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्यामुळे महिलेचे समुपदेशन करण्याचे आरोग्य खात्याने ठरविले आहे. (प्रतिनिधी)
साडेदहा लाख दाम्पत्य आरोग्य खात्याच्या रडारवर
By admin | Published: July 11, 2016 12:23 AM