लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिन्याच्या सरासरीच्या ७० टक्के पाऊस जिल्ह्यात झाल्याने टंचाईग्रस्त गावे तसेच त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरमध्ये कमालीची घट होऊ लागली असून, एकाच दिवसात १८ टॅँकर कमी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक तालुक्यांना झोडपून काढले. यंदा पहिल्यांदाच जून महिन्यात पावसाने आश्चर्यचकित करून सोडल्याने सरासरीच्या तुलनेत ७० टक्के पाऊस जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पडला आहे. त्यामुळे त्र्यंबक, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण, सुरगाणा, देवळा या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई घटण्यास मदत झाली आहे. गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना टॅँकरचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार अठरा टॅँकर कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्णात ११३ गावे व १३३ वाड्यांना ७४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाऊस सुरू झाल्याने आता ही संख्या ८७ गावे व ८१ वाड्यांवर येऊन ठेपली आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे जून महिन्याची सरासरी असलेली पावसाची टक्केवारी पाहता आजपावेतो ७० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यात नाशिक- २१०, इगतपुरी- ३६, दिंडोरी- ५०, पेठ- ४६, त्र्यंबकेश्वर- ४८, मालेगाव- १२२, नांदगाव- १६९, चांदवड- १२७, कळवण- ५५, बागलाण- ८५, सुरगाणा- ६९, देवळा- ४४, निफाड- ७८, सिन्नर- ८१, येवला- ५८ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात १८ टॅँकर घटले
By admin | Published: June 18, 2017 12:28 AM