नाशिक : कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात बंद राहिलेले उद्योग सावरण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यांत मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांनी १८ हजार ८९७ पर्यंतचा उच्चांक गाठल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने दिलेल्या सवलतीचा ३१ डिसेंबरपर्यंत लाभ घेऊ न शकलेल्या ग्राहकांसाठी ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत मिळणार आहे, परंतु नाशिककरांनी तीन टक्के सवलत मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सातही उपनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी करून तीन टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करून, पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी प्रक्रिया करण्याची संधी प्राप्त केली आहे, तर या कालावधीत मुद्रांक शुल्कासह दस्त नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना चार टक्के शुल्क भरून खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहे. बांधकाम व्यवसायातील मरगळ झटकण्यासोबतच या व्यवसायावर आधारित सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्य उत्पादक उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली ३ टक्के सवलतीची मुदत गुरुवारी (दि. ३१) संपुष्टात आली. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांनी घरखरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
इन्फो-
४७३ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल
१)कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने तीन टक्के सवलत दिल्याने डिसेंबर, २०२० अखेर ४२० कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य निर्धारित केले असताना, तब्बल ४७३ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
२) कोरोनामुळे एप्रिल महिन्यात कडेकोट टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे एप्रिल, २०२० मध्ये एकही खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नसल्याने शासनाला एक रुपयाचाही महसूल मिळू शकला नाही.
३) डिसेंबर महिन्यात २०२० मधील दस्तनोंदणीचा उच्चांक नोंदला गेला. महिनाभरात जिल्ह्यात १८ हजार ८९७ व्यावहार नोंदले गेले, त्यातून सरकारला तब्बल ८६ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
पॉईंटर -
महिना - दस्त संख्या -
एप्रिल - ००० -
मे - २२४७ -
जून - ८,०१३ -
जुलै - १०,५२९
ऑगस्ट - १०,५०२ -
सप्टेंबर - ११,४७२ -
ऑक्टोबर - १३,३६२ -
नोव्हेंबर - १२,६५९ -
डिसेंबर - १८,८९७ -
कोट-
मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन उपनिबंधक कार्यालयांचे कामकाज आवश्यकतेनुसार, रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंतची दस्त नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडली असून, मुद्राक शुल्काच्या माध्यमातून इष्टांकाहून अधिक महसूल प्राप्त झाला.
- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक