नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २०) नवीन १५२७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १८१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३२ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४२३४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या गत आठवडाभरापासून सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक राहात असल्याने पुन्हा बाधितसंख्येत थोडीशी घट आली आहे. त्यामुळेच गुरुवारी एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १७,७०६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ६१२, नाशिक ग्रामीणला ९०७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ८ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला १७, मालेगाव मनपा ६, असा एकूण ३२ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या पुन्हा शहरातील बळींच्या तुलनेत दुप्पट आहे. आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या पावणेचार लाखावर, तर कोरोनामुक्त नागरिकांची संख्या साडेतीन लाखांवर पोहोचली आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९४ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४.१७ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६ टक्के, नाशिक ग्रामीण ९१.६५, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८८.५९ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल चार हजारांवर
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा चार हजारांचा आकडा ओलांडून ४०९२वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे २५६८, नाशिक मनपाचे १३७२, मालेगाव मनपाचे १५२ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग अद्याप कायम असल्यानेच तेथील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे.