नाशिक : शहर व परिसरात चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी अवैधरीत्या केलेल्या नायलॉन मांजाचे साठे पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ व पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी (दि.२) शहरातील पंचवटी व जुने नाशिक परिसरात केलेल्या छापेमारीत सुमारे एक लाख तीन हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे १८८ गट्टू जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली असून, यासाठी नायलॉन मांजाचाही वापर सर्रासपणे होत आहे; मात्र हा नायलॉन मांजा मानवी जीवितास तसेच पर्यावरणासाठी हानीकारक ठरणारा असल्याने यावर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी निर्बंध आणले आहे. याबाबत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली. या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.