बनावट आणि अस्सल ई-मेल आयडीशी नक्कल असल्याचा गैरफायदा घेत स्टर्लिंग मोटर्स या वाहन शोरुमची सुमारे १९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक सायबर चोरट्यांनी केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या वाहन शोरुमचे आर्थिक व्यवहाराचे खाते युनियन बँकेत असून, चोरट्यांनी ती माहिती मिळवत मोठा डल्ला मारला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्यातून रक्कम लांबविण्यासाठी शोरुमच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून त्या लेटरहेडच्या आधारे युनियन बँकेला ई-मेल पाठवून १८ लाख ७९ हजार ७०० रुपयांची रक्कम परस्पर दोन वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात वर्ग करण्याची विनंती करत फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे करत आहेत. बोरसे हे पथकासमवेत बिहार येथील गोपालगंजमध्ये ९ मार्च रोजी दाखल झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पथकाने संशयित फय्याज मन्सुरी (२४, रा. उत्तर प्रदेश), प्रेमसागर महेश राम (३१, रा. बाथना कुटी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यात रक्कम वळविल्याचे आढळून आले. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकून नाशकात आणले. त्यांचा मास्टरमाईंड हा अद्याप फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
वाहन शोरुमला १९लाखांनी चुना लावणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:16 AM