नाशिक: यंदा सर्वत्र दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे जिल्हा आपत्ती कक्षदेखील सज्ज झाले असून संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यासाठी १९ रेस्क्यू बोटसह ५० जीवरक्षकांची टीमसज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
मान्सूनपूर्व कामाचे निायेजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नदी, नाल्यांना येणाऱ्या पूरपरिस्थितीचा विचार करता संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण व हेल्पलाईन कक्ष येत्या १ जूनपासून कार्यन्वित केला जाणार आहे.
येत्या १ जूनला केरळ किनारपट्टीवर मान्सून धडकणार असून यंदा सर्वत्र शंभर टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस झाला तर अनेक धरणांतून विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १९ बोट्स सज्ज असून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ९ बोटींची मागणी करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी ५० स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षात नाशिक जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. या परिस्थितीची सामना करण्यासाठी मागील वर्षी एनडीआरएफची टीमदेखील जिल्ह्यात तैनात करण्यात आली होती. या टीमने पुराच्या पाण्यात अनेक ठिकाण ऑपरेशन राबविले. यंदाही एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथकाची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
--इन्फो--
यंत्रणा सज्ज
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन - २ रबर बोट
- नाशिक मनपाकडे - ३ बोट
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १० रेस्क्यू बोटस्
- सोमेश्वर बोट क्लब - २ बोट
- केटिएचएम बोट क्लब - २ बोट
- २० गिर्यारोहकाचे पथक
- ६४ ठिकाणी माॅकड्रिल
- जिल्हा नियंत्रण कक्ष - ०२५३ - २३१७१५१