नायगाव : नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या मुदतीत १९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे तीन संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, उर्वरित १२ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.जिल्हा दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळ निवडीसाठी २८ जून रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. माघारीच्या निर्धारित वेळेत १९ जणांनी माघार घेतली. यामुळे सर्वसाधारण गटासाठी मालेगाव तालुक्यातून विनोद गुलाब चव्हाण, तर कळवण तालुक्यातून योगेश बाळासाहेब पगार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. अनुसूचित जाती प्रवर्गातून शिवाजी नंदू बोऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.सर्वसाधारण गटाच्या तालुकानिहाय नऊ जागांसाठी सिन्नर - २, नांदगाव- ३, येवला- २, नाशिक- २, चांदवड- २, दिंडोरी- २, मालेगाव- २, निफाड-४, सटाणा-३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर मागास वर्गाच्या एका जागेसाठी तीन तर महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार असल्याची गेले काही दिवस चर्चा होती. मात्र, आठवडाभरातील नाट्यमय घडामोडींनंतर अनेक मातब्बरांनी निवडणुकीत उडी घेतल्याने बिनविरोध निवडीची अपेक्षा फोल ठरली. सध्यातरी ही निवडणूक सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनलमध्ये समोरासमोर लढत होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)
१९ जणांची माघार : तीन संचालक बिनविरोध
By admin | Published: June 15, 2015 11:05 PM