नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे.नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती. मध्यंतरी त्यांच्याकडून अर्धन्यायिक कामकाज काढून घेत पंख छाटण्यात आले होते. शिवाय त्यांच्या बदलीसाठी अन्य इच्छुक तहसीलदारांप्रमाणेच खुद्द जिल्हाधिकारीदेखील उत्सुक असल्याची चर्चा कायमच रंगत होती. या बदल्यांमध्ये गेल्या मे महिन्यात बागलाण तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेल्या वंदना खरमाळे यांची अखेर इगतपुरीत नेमणूक करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या बागलाणसाठी नंदुरबारहून प्रमोद हिले यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर इगतपुरीचे अनिल पुरे यांची नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांची विभागीय आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. नांदगाव तहसीलदारपदी पारनेरच्या भारती अण्णासाहेब सगरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकरोडच्या महसूल प्रबोधिनीच्या अर्चना खेतमाळीस यांची एरंडोल येथे, तर विभागीय आयुक्तालयातील मंजूषा घाडगे यांची महसूल प्रबोधिनी येथे बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे दत्तात्रय शेजूळ यांची देवळा तहसीलदार म्हणून, तर देवळ्याचे कैलास पवार यांची नगरला बदली झाली आहे. येवल्याचे नरेशकुमार बहिरम यांची पिंपळनेर -साक्रीला बदली झाली असून, त्यांच्या जागी दोंडाईचा येथील रोहिदास वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरच्या रचना पवार यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये नाशिक विभागातील १९ तहसीलदारांचा समावेश असून, या सर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे, असे शाासनाचे आदेश आहेत.हस्तक्षेपाचा आरोप खरागेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या बागलाण व नांदगाव या तालुक्यालादेखील या बदल्यांमध्ये पूर्णवेळ तहसीलदार मिळाला आहे. विशेष म्हणजे बागलाणच्या तहसीलदारांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यानिमित्ताने खरा ठरला आहे.
नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:26 AM
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देबागलाण, नांदगावला मिळाले पूर्णवेळ तहसीलदार