नाशिक : नववर्षाच्या प्रारंभी महाआरोग्य शिबिराअंतर्गत नोंदणी झालेल्या १०२० रुग्णांना जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.१) चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. महाआरोग्य शिबिरांतर्गत ६२३९ रुग्णांची तपासणी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली होती. प्राथमिक तपासणीनंतर दृष्टीदोष निवारण्यासाठी ज्या रु ग्णाना चष्म्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांपैकी शहरातील १९२० रुग्णांसाठीचे चष्मे वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले. संबंधित रुग्णांना चष्मे वाटप जिल्हा रुग्णालयांतर्गतच्या नेत्र विभागात नेत्रतज्ज्ञ डॉ. सातपुते व डॉ. अनंत पवार यांचे हस्ते करण्यात आले. याव्यतिरिक्त इतर १५ तालुक्यांतील रुग्णांच्या चष्म्याचे वाटप संबंधित तालुक्याच्या शासकीय नेत्रतज्ज्ञांमार्फत वाटप करण्यात येणार आहे. संबंधितांनी सामान्य रुग्णालय, नाशिक तथा आपल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त महाआरोग्य शिबिरात उपस्थित न राहू शकलेल्या व डोळ्यांचा विकार असलेल्या रुग्णांनी सोमवारी (दि.६) नाशिक शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे फेरतपासणीसाठी उपस्थित राहावे. तसेच २१ फेब्रुवारीला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक ग्रामीण (उत्तर) येथील रुग्णांची एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय, इगतपुरी येथे फेरतपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
महाआरोग्य शिबिरात १९२० चष्म्याचे वाटप
By admin | Published: February 04, 2017 10:59 PM