ग्रामपंचायत निवडणूक : अकरा हजार जागांसाठी उद्या मतदान
नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य रवाना करण्यात आले. निवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील तहसील कार्यालयातून निवडणूक कर्मचारी साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. सकाळपासून तहसील कार्यालयावर निवडणूक कर्मचारी तसेच अधिकारी यांनी साहित्यांची जुळवाजुळव करून साहित्य ताब्यात घेतले.
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१५) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून १६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, लिलाव प्रकरणी चर्चेत आलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक गुरुवारी सायंकाळी राज्य निवडणूक आायुक्तांनी रद्द केली. त्यामुळे निवडणूक रिंगणातील दोन जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची निवडणूक देखील रद्द झालेली आहे.
जिल्ह्यातील ६१ बसेसच्या माध्यमातून तसेच ४०२ जीप आणि १२६ मिनी बसेसच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना करण्यात आले. मतदानासाठी २५६० कंट्रोल युनिट तर तितकेच बॅलेट असे एकूण ५१२० युनिटस १९५२ मतदान केंद्रांवर पोहोचले आहे.