नाशिक : बालपणी वडीलांनी अचानकपणे घर सोडले... त्यानंतर आईने लहानाचे मोठे केले अन् उच्च शिक्षणही दिले... २००७साली नियतीने आईलाही तिच्यापासून हिरावून घेतले... उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिने चार ते पाचवर्षांपुर्वी गोव्याला विवाह केला...मात्र वडील घर सोडून गेल्याची हुरहुर मनात कायम राहिली...वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली गेली नसल्याचे समजल्यानंतर त्या कन्येने चक्क गोव्याहून पुन्हा सातपूरला दाखल होऊन आपले वडील बेपत्ता झाल्याची तब्बल २५ वर्षानंतर तक्रार शनिवारी (दि.११) दाखल केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर कॉलनी परिसरात ज्युड जोसेफ ब्रेगेन्सा (६२) हे आपली पत्नी, लहान मुलीसोबत घर क्रमांक १०८मध्ये वास्तव्यास होते. ब्रेगेन्सा हे रिक्षाचालकाचा व्यवसाय करत होते. १९९४ सालापासून ते घरातून रिक्षावर जातो असे त्यांच्या पत्नीला सांगून निघाले; मात्र अद्यापपर्यंत परतून आले नाही. आईने मुलीला याबाबत फारसे न सांगता तिचे पालनपोषण केले. इंग्रजी माध्यमातून उच्चशिक्षण दिले. मुलगी शेरॉँन डिसोजाने एमएसस्सीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर गोव्याच्या मुलासोबत विवाह केला. २००७ साली शेरॉँन १७ ते १८ वर्षांची असातानाच आईचे निधन झाले. त्यामुळे आईकडून वडील घर सोडून का गेले? कोठे गेले? पोलीसांकडे नोंद आहे किंवा नाही, याबाबत शेरॉँन यांना काहीही माहिती मिळू शकली नाही. वडील निघून गेले आहे, ते आलेले नाही, हेच वाक्य त्यांना आईकडून बालपणी ऐकवयास मिळाले. वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून पुढील तपास हवालदार देवरे करीत आहेत.पोलिसांपुढे आव्हान१९९४साली बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध २५वर्षानंतर घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. कारण २५वर्षांपुर्वी ब्रिगेन्सा घर सोडून गेले तेव्हा ते तरूण असतील आणि आता त्यांचे वय त्यांच्या मुलीने अंदाजे ६२ वर्षे असे नोंदविले आहे. त्यामुळे छायाचित्राच्या आधारेदेखील त्यांचा शोध घेणे जिकिरीचे ठरणार आहे. पोलिसांनी शेरॉँन यांची तक्रार दाखल करून घेतली आहे; मात्र त्यांचा शोध घेताना पोलिसांचा कस लागणार हे निश्चित.
१९९४साली वडिलांनी सोडले घर; २५ वर्षांनतर कन्येकडून मिसींग नोंद
By अझहर शेख | Published: May 12, 2019 10:57 PM
वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली.
ठळक मुद्देबालपणी वडीलांनी अचानकपणे घर सोडले... शेरॉँन १७ ते १८ वर्षांची असातानाच आईचे निधन