नाशिक : राज्य सरकारने समिती गठीत करून निश्चित केलेली १९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख असून, दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शासनाने निश्चित केलेलीच शिवजयंती खरी असून, सरकारच्या निर्णयाची पायमल्ली करून काही पक्ष, संस्था व संघटना जन्मतारखेचा वाद निर्माण करून १५ मार्च रोजी शिवजयंती साजरी करीत असल्याने अशा शिवजयंतीस परवानगी देऊ नये, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद मिटावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक यांच्या काळात १९६६ साली समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित करण्यात आली होती. शिवसेना व भाजप युतीच्या कालखंडात मांडल्या गेलेल्या या सूचनेला सेनेचे चंद्रकांत पडवळ, रवींद्र गायकवाड, कॉँग्रेसमधून इतिहासाचे प्राध्यापक सुहेल लोखंडवाला, माणिकराव ठाकरे, भाजपाच्या रूपलेखा ढोरे यांनी पाठिंबा दिला होता. अधिवेशन काळात यावर अंतिम निर्णय होण्याअगोदर सेना-भाजपने विधानसभा बरखास्त केली व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात दोन्ही कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यावर कॉँग्रेस सरकारने आश्वासनाची पूर्तता केली व १३ मार्च २००० रोजी राज्यपालांनी आपल्या भाषणात फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख राज्य सरकारने स्वीकारली असून, आता यापुढे प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी केली जाईल असे सांगितले होते. मात्र सन २००० मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यावर सेना, भाजपाने राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची थट्टा सुरू केली ती आजतागायत चालूच आहे. कालनिर्णयसारख्या बहुतांश दिनदर्शिकाही सरकारच्या या निर्णयाची पायमल्ली करीत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना हे निवेदन देण्यात आले. त्यावर संतोष गायधनी, संतोष माळोदे, मधुकर कासार, विकास भागवत, अस्मिता देशमाने, माधवी पाटील, ललिता गोवर्धने आदिंची नावे आहेत. (प्रतिनिधी)
१९ फेब्रुवारीलाच खरी शिवजयंती
By admin | Published: March 08, 2017 12:23 AM