नाशिक : सातपूर परिसरात एका बँकेचे एटीएम फोडून पळ काढणाऱ्या पाच संशयित आरोपींपैकी दोघा संशयितांना पोलिसांनी मंगळवारी (दि.24) पहाटे साडेचार वाजता पंचवटी परिसरात हिरावाडीरोडवरील विधातेनगर याठिकाणी ताब्यात घेतले आहे.
सातपूर या ठिकाणी पाच संशीयतानी एका बँकेचे एटीएम फोडले व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची घटना रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली लागतात संशयितांनी बोलेरो जीप मधून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी सदर बोलेरो चा पाठलाग सुरु केला बोलेरोसह सर्व संशयित पंचवटीतील हिरावाडीरोडने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पंचवटीत पोलीस ठाण्याच्या सीआर मोबाईलने पाठलाग करून हिरावाडी रोडवरील विधातेनगर परिसरात बोलेरो ला पोलीस गाडी आडवी लावून दोघा संशयितांना पकडले तर अन्य संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दोघा संशयित आरोपींना सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून यापूर्वी शहरात झालेल्या एटीएम पुढच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सदर संशयित आरोपींकडून पोलिसांनी बोलेरो जप्त केली असून या चारचाकी गाडीला एमएच 15 व ए एच 19 अशा दोन नंबर प्लेट असल्याचे उघडकीस आले आहे. जीप चोरीची आहे का याचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर येथे एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला होता.