लोकशिक्षण मंडळ : परिवर्तन-संस्थापक पॅनलमध्ये लढत; प्रथमच निवडणूक होत असल्याने चुरस
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व परिवर्तन पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.अध्यक्षपदासह चार पदाधिकारी, तीन विश्वस्त व ११ संचालक अशा एकूण १८ जागांसाठी येत्या १८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. संस्थेत एकूण १३६६ सभासद मतदारसंख्या आहे. संस्थेच्या व्ही.पी. नाईक हायस्कूल, नांदूरशिंगोटे व भोजापूर खोरे हायस्कूल, चास अशा दोन शाखा आहे. १८ जागांसाठी ११४ अर्ज दाखल झाले होते. त्यात ७८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३६ उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्रीपाद जोशी, सदस्य गोपाळ शेळके, जगन्नाथ खैरनार यांनी दिली.अध्यक्षपदासाठी जयसिंह सुदाम सांगळे व संदीप शिवाजी भाबड, उपाध्यक्ष पदासाठी बंडूनाना दामोधर भाबड व प्रशांत सुभाष सानप, सरचिटणीस पदासाठी कृष्णा विलास सानप व बी. टी. शेळके, सहचिटणीस पदासाठी संजय दगडू शेळके व पोपट दामोधर शेळके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे, तर विश्वस्तपदाच्या तीन जागांसाठी ६ उमेदवारांमध्ये थेट सामना आहे. केरू रामजी भाबड, शिवाजी बबन दराडे, मारुती कारभारी दराडे यांच्यात सरळ लढत होत आहे.संचालकपदाच्या नांदूरशिंगोटे गटाच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सुधाकर कारभारी शेळके, नागेश शिवनाथ शेळके, दत्तात्रय वेडू सानप, अरुण भाऊपाटील शेळके, सुनील काशीनाथ मुंढे, रंजना उत्तम इलग, नामदेव लक्ष्मण गर्जे, चंद्रकांत मारुती शेळके यांच्यात समोरासमोर सामना रंगणार आहे. संचालकपदाच्या चास गटाच्या चार जागांसाठी परशराम तुकाराम भाबड, तुकाराम महादू भाबड, दिलीप राधाकिसन खैरनार, चंद्रभान कारभारी दराडे, शरद एकनाथ दराडे, जगन्नाथ गंगाधर खैरनार, सुनील जगन्नाथ भाबड यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. लोकशिक्षण मंडळ ही शैक्षणिक संस्था स्थापन झाल्यानंतर गेल्या ५५ वर्षांच्या काळात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबविली जात असल्याने सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वीस वर्षांपूर्वी संस्थेत नांदूरशिंगोटे व भोजापूर परिसरातील आणि उर्वरित तालुक्यातून सभासद नोंदणी झाली होती. त्यानंतर प्रथमच सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.विरोधी गटांकडून परिवर्तन, तर सत्ताधारी गटाकडून संस्थापक पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथमच निवडणूक होत असल्यानेअध्यक्ष व सरचिटणीस पदासाठी मोठ्या प्रमाणात चुरस पहायला मिळणार आहे.