नाशिक : सफाई कामगार संघटनांचा विरोध असतानाही प्रशासनाने आउटसोर्सिंगने सफाईची कामे करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सदरचा ठेका २० कोटी ८० लाख रुपयांचा असताना प्रत्यक्षात मात्र त्यात पाच कोटी रुपयांची आणखी वाढ झाली असून, संगनमताने हा प्रकार सुरू आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सफाई कर्मचारी विकास युनियनने केली आहे.यासंदर्भात संबंधितांनी आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या वतीने साफसफाईच्या कामासाठी मुळातच सफाई कामगार कमी आहेत. त्यांची पदे रिक्त असून, ती भरण्याऐवजी आउटसोर्सिंगने काम पूर्ण करण्याचे घाटत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेने फेटाळला आणि मानधनावर सफाई कामगारांची भरती करावी, असा ठराव केला होता. मात्र तो फेटाळून प्रशासनाने आउटसोर्सिंगसाठी निविदा मागवल्या आहेत. सदरच्या निविदेतदेखील एकही पात्र न ठरल्याने ही निविदा रद्द करण्यात आली आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमताने निविदा अटीत फेरफार करण्यात आल्याने गोंधळ होत आहे. हा ठेका २० काटी ८० लाख रुपयांचा असतानादेखील त्यात पाच कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही बाबत गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे युुनियनचे सुरेश मारू, सुरेश दलोड, जितेंद्र परमार, विक्की बिडलॉन, राजू मकवाना, केतन रेवर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सफाई कामगारांच्या आउटसोर्सिंग कामात ५ कोटींचा घोळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:46 AM