सिडको : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या आमिषाने डीटी मार्केटिंग कंपनीने ३८ जणांची सुमारे दोन कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद अंबड पोलिसांत दाखल आहे. मार्केटिंगच्या सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.सिडकोतील स्टेट बँक चौकात डीटी मार्केटिंगचे कार्यालय असून, या मार्केटिंग कंपनीने गुंतवणुकीवर आकर्षक भरघोस परतावा जाहीर केला होता. सुरेंद्र मोहरसिंग मोहबिया (३०, रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी ओळखीच्या व्यक्तीच्या सहाय्याने या डीटी मार्केटिंगमध्ये आॅनलाइन खाते उघडले व आॅनलाइन रक्कम गुंतवणूक केली. मार्केटिंगमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा व विविध कंपन्यांच्या बँडेड गृहोपयोगी वस्तू मिळणार असल्याचे आमिष कंपनीने दाखविले होते. मोहबियांसमवेत ३८ जणांनी या मार्केटिंगमध्ये वेळोवेळी रक्कम जमा केली. यात सदर रक्कम १ कोटी ८६ लाख ३७ हजार रु पये झाली. या मार्केटिंग कार्यालयाने ठराविक कालावधीनंतर परतावा मिळेल, असे सांगितले होते. गुंतवणूक कालावधी संपल्यानंतर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संचालक संजय रघुनाथ दुसाने यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांनी गुंतवणुकीवर परतावा केला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.याबाबत सुरेंद्र मोहबिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मार्केटिंगचे मुख्य व्यवस्थापक संचालक संजय रघुनाथ दुसाने, मीरा संजय दुसाने, प्रवीण रघुनाथ दुसाने, रेखा रघुनाथ दुसाने, मनोज शांताराम पवार, गणेश वडनेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
गुंतवणूक कंपनीकडून २ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 1:02 AM