नाशिक : शासनाकडून प्रत्येकी ५७६० रुपयांना मिळालेल्या ॲम्फोटेरेसिनच्या इंजेक्शनसाठी ७८२४ याप्रमाणे प्रत्येकी २०६४ रुपये जादा दर सिव्हीलकडून आकारण्यात आला होता. त्यामुळे प्रत्येक बाधिताच्या कुटुंबियांनी जादा दिलेले ४ इंजेक्शनसाठीचे ८२५६ रुपये प्रत्येकाला दोन दिवसात परत करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिले आहेत. शुक्रवारी बाधितांच्या कुटुंबियांना दिलेल्या १४० इंजेक्शन्ससाठीचे २ लाख ८९ हजाराची अतिरिक्त रक्कम जिल्हा रुग्णालयाला परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
म्युकरमायकोसिसवर प्रभावी ठरणारे ॲम्फोटेरिसिन प्रशासनाकडूनच जिल्हा रुग्णालयात गुरुवारी आणि शुक्रवारी उपलब्ध करुन देण्यात आले होते. गुरुवारी ६० ता शुक्रवारी १४० ॲम्फोटेरिसिनच्या इंजेक्शन्सचे वितरण करण्यात आले. त्यात गुरुवारी आलेल्या इंजेक्शनचा दर हा प्रतिइंजेक्शन ७,८२४ रुपये होता. मात्र, शुक्रवारी प्राप्त झालेल्या इंजेक्शनची छापील किंमत ५७६० रुपये असतानाही सिव्हीलच्या यंत्रणेकडून प्रत्येकी ४ इंजेक्शनसाठी ७,८२४ या दराप्रमाणेच ३१ हजार २९६ रुपयांचे धनादेश स्वीकारण्यात आले. प्रत्येक इंजेक्शनमागे २०६४ रुपये जादा आकारल्याचे अनेक बाधितांच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. शासकीय यंत्रणेकडून सामान्यांची लूट होऊ लागल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच आधीच उपचारांसाठीच्या प्रचंड खर्चामुळे नागरिक चिंतेत पडलेले असल्याने जादा घेतलेले पैसे त्वरीत परत करण्याची मागणीदेखील नागरिकांनी केलेली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी लोकमतने ‘इंजेक्शन चार, रक्कम आठ हजार’ हे वृत्त प्रकाशित करुन या प्रकाराला वाचा फोडली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाकडून या प्रकरणाची दखल घेण्यातं आली. कोट
१९ आणि २० मे या दोन दिवशी प्राप्त झालेल्या लसींच्या दरामध्ये भिन्नता आहे. त्यामुळे निर्धारीत शासकीय दरापेक्षा अधिकची रक्कम चेक किंवा डीडीमार्फत प्राप्त झाली असल्यास ती फरकाची रक्कम चेकव्दारे संबंधितांना २ दिवसात परत करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक