नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये १२ अपघात हे गंभीर नुकसानग्रस्त असल्याची नोंद महामंडळाने केली आहे. या अपघातामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या गाड्यांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने लाल पिवळ्या गाड्यांची ओळख पुसण्यासाठी आरामदायी प्रवासी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. यापूर्वी निमआराम, व्हाल्वोसारख्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या होत्या.आता शिवशाही बसेस राज्याच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या असून, नाशिक विभागासाठी टप्प्याटप्प्याने ७७ शिवशाही बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद, तुळजापूरसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी याबसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या मार्गावर महामंडळाने आरामदायी अशा शिवशाहीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक विभागातील शिवशाही बसेसला अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये वर्षभरात २० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये एकाही प्रवाशाला इजा झालेली नाही, मात्र गाड्यांचे इतर दोघांना प्राण गमवावे लागले आहेत. नाशिक शहरातून जाणाºया या गाड्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून, उत्पन्नदेखील चांगले मिळत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. आरामदायी आसनव्यवस्था तसेच वातानुकूलित, वायफाय सुविधेमुळे या बसेसला मोठ्या प्रमाणात प्रवासी पसंती देतात. अर्ध्या तासाच्या अंतराने या बसेस उपलब्ध असल्यामुळे, तर प्रवाशंची सोय झाली आहे. त्यामुळे या बसेसची दैनंदिन मागणी वाढतच आहे.
वर्षभरात शिवशाहीचे २० अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:45 AM