नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसूतींपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के प्रसूती सीझेरियन होत असून, जिल्हा रुग्णालयांत मात्र हे प्रमाण २० टक्केच आहे. त्यातही जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये गरीब घरांतील, आदिवासी पाड्यांवरील कुपोषित महिलांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी सीझेरियन करणे भाग पडते. तसेच बिकट केसेस सर्व जिल्हा रुग्णालयात पाठविल्या जात असल्याने जिल्हा रुग्णालयात हेच प्रमाण १५ टक्क्यांपेक्षाही कमी भरण्याची शक्यता आहे.
बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात, विशेषतः लैंगिक अवयवांमध्ये बदल घडतात. हे अवयव परत आपल्या गरोदरपणापूर्वीच्या स्थितीत येतात, त्या काळाला वैद्यकीय भाषेत प्युर्पेरिअम असे म्हणतात. हा प्रसूतीनंतरचा काळ सहा आठवड्यांपर्यंत चालू राहतो. कदाचित हेच कारण आहे की, परंपरागत संकल्पनांनुसार प्रसूतीनंतर सव्वा महिना बहुतेक भारतीय घरांमध्ये बंधन पाळले जायचे. त्यामुळे स्त्रीला तब्येत सुधारायला वेळ मिळावा, हाच त्यामागील उद्देश होता. काही किचकट प्रकरणांमध्ये महिला आणि बाळाच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामध्ये प्रसूतीनंतरचा अधिक रक्तस्रव, रक्तप्रवाह कोसळणे, हृदयाघात इत्यादी कारणांचा समावेश असतो.
इन्फो
शहरी भागात वाढल्या सीझेरियन
मुली आणि महिलांमध्ये वाढलेले लठ्ठपणाचे प्रमाण तसेच बहुतांश घरगुती कामे एकतर मशीनच्या साहाय्याने किंवा कामवाल्या बाईच्या मार्फत होत असल्याने प्रसूतीपूर्वी महिलांच्या वजनाचे प्रमाण खूप वाढू लागल्याचे दिसून येते. तसेच एक-दोन मुलांवरच कुटुंब नियंत्रित ठेवायचे नियोजन असल्याने माहेर आणि सासर दोन्हींकडून अतिरिक्त विश्रांतीचे सल्ले दिले जातात. तसेच महिलांच्या दिनक्रमात झालेले बदलदेखील सीझेरियनचे प्रमाण वाढण्याचे कारण ठरले आहेत.
कोट
सिव्हिलमधील प्रमाण निम्म्याहून कमी
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या महिलांमध्ये अनेक महिला अशक्त असतात. त्यांचे हात, पायदेखील कृश झालेले असतात. तसेच जिल्हा रुग्णालय हे रेफरल सेंटर असल्याने तिथे किचकट प्रसूतींचे प्रमाण अधिक असते. बिकट परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा रुग्णालयात सीझेरियन केल्या जातात. मात्र, त्यांचे प्रमाण खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी म्हणजे सुमारे २० टक्केच आहे.
योगेश गोसावी, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय
कोट
ज्या महिला पूर्वीपासून शारीरिकदृष्ट्या दुर्बल असतात, रक्तक्षय, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारख्या व्याधींनी ग्रस्त असतात किंवा आर्थिक दुर्बलतेमुळे ज्यांना पोषण नीटसे मिळालेले नसते, अशाच महिलांची सीझेरियन करावी लागते. अशाच महिलांची सीझेरियन प्रसूती जास्त होते. तसेच अशा स्त्रियांना प्रसूतीनंतर किमान दोन ते तीन दिवस दवाखान्यात ठेवून सर्व बाबींची काळजी घेतली जाते.
डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक