ममदापूर : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उत्तरपूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सर्व विहिरी कोरड्याठाक झाल्या असून, माणसासह जनावरेही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. त्यामुळे बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्यासाठी विद्युतपुरवठा गरजेचा आहे. मात्र वीस तास उलटूनदेखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. ममदापूर, खंरवडी, देवदरी या परिसरात राजापूर येथील उपक्र ेंदातून विद्युतपुरवठा करण्यात येतो. तेथे लहित फिडर व ममदापूर फिडर असे दोन फिडर असून राजापूर हे लहित फिडरवर असल्याने या गावांचा विद्युतपुरवठा कधीच खंडित होत नाही; मात्र ममदापूर, खरवंडी, देवदरी या परिसरात पावसाळ्यात नेहमीच विस पंचवीस तास विद्युतपुरवठा खंडित होत असतो. राजापूर येथे वीज कंपनीचे कर्मचारी राहण्यासाठी दोन मजली इमारत असूनही सर्व आधिकारी बाहेरगावी राहून येथील कारभार पाहात असल्याने थोडा जरी खोळंबा झाला तरी दहा-बारा तास विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही. कदाचित झाला आणि लोडशेडिंगचा वेळ झाला की सबस्टेशनमधुन विद्युतपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे शेतकरी मोटार चालू करण्याच्या आत वीज जाते त्यामुळे आणखी सहा सात तास वाट बघावी लागते. तसेच वाड्या-वस्त्यांवर दहा ते पंधरा दिवसात एक टँकर येत आसल्याने माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील विद्युत तारा जीर्ण झाल्याने विजेचा खोळंबा होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)
ममदापूर परिसरात २० तास वीज गायब
By admin | Published: May 09, 2016 11:44 PM