एकलहरे : सुमारे दीड वर्षापूर्वी एकलहरे रोडवरील संभाजीनगर, भोर मळा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दांपत्यासह तीन वर्षांचा मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. स्फोटातून बालंबाल बचावलेल्या दोघा चिमुलकल्यांचा आधार कोसळला. त्यांच्या उदरनिर्वाह व पोषणाचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेत संबंधित गॅस कंपनीकडे पाठपुरावा करून सुमारे २० लाखांची रक्कम मदत म्हणून मिळवून दिली आहे.
भोर मळा येथील या घटनेत नरसिंग कांबळे व त्यांची पत्नी नम्रता कांबळे, मुले निखिल, नेहा आणि अथर्व हे सर्व गॅसच्या भडक्याने गंभीर भाजले होते. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच तीन-चार दिवसांच्या अंतराने नरसिंग कांबळे (४४), पत्नी नम्रता (४०) मुलगा अथर्व (३) यांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले, तर निखिल (७) नेहा (४) हेदेखील भाजलेले होते. नेहाची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारार्थ मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई व वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांची जबाबदारी आजी- आजोबांवर येऊन पडली. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नेहाच्या पुढील उपचाराचा खर्च कसा करावा याची चिंता त्यांना सतावत होती. याबाबतची माहिती जानोरी (ता. दिंडोरी) येथील कानिफनाथ महाराज मंदिराचे संस्थापक रहाणे यांच्या प्रेरणेने कार्य करणाऱ्या सेवा संस्थेला मिळाली. या संस्थेने पुढाकार घेऊन कुटुंबाला आर्थिक मदतीचा लाभ मिळवून दिला, तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडे तक्रार नोंदवली. एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सुमारे २० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत विम्याच्या स्वरूपात नेहा व निखिल या भावंडांना मिळाली.
चौकट===
या सामाजिक कार्यात हातभार लावणारे भारत पेट्रोलियमच्या प्रणाली मेश्राम, व्यवस्थापक गुप्ता, गॅस एजन्सीचे राजेश महाले, युवराज जगळे, हवालदार विलास उजागरे व जखमींवर उपचार करणारे डॉ. राजेंद्र नेहते यांचा रहाणे बाबा सेवा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.