नाशिक : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि.५) दिवसभरात महापालिका हद्दीतील विविध उपनगरांमध्ये एकूण २० कोरोनाबाधित रूग्ण आढळले तर जिल्ह्यात १० नवे कोरोनाग्रस्त रूग्ण मिळाले.
महापालिका क्षेत्रात सध्या ७२ प्रतिबंधित क्षेत्र असून आता कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ३३८ वर पोहचली. नाशिक महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोेरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. पंचवटी परिसरातील राहूलवाडी, भराडवाडी, पेठरोड तसेच जुने नाशिक परिसरातून मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मागील चार दिवसांपासून वडाळागाव परिसरातून दिलासा मिळाला असून एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आलेला नाही. तसेच शिवाजीवाडी भागातूनही काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र खोडेनगर आणि पखालरोड या भागात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण सलग मिळून येत असल्याने आता चिंता वाढत आहेत. वडाळा शिवारातील संत सावता माळी कॅनॉल रस्त्याच्या खालील बाजूने वसलेल्या खोडेनगर भागात सलग तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शुक्रवारी खोडेनगर भागातून ४ वर्षाचा मुलगा व ५ वर्षाची मुलगी तसेच ५३ वर्षीय पुरूष आणि ४७,२३,२४ वर्षीय ३ महिला कोरोनाबाधित आढळून आल्या. एकूण ८ नवे रुग्ण मिळून आले. तसेच जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा भागात ४०वर्षीय महिला तर याच परिसरातील अजमेरी चौकात राहणाऱ्या एका ५० वर्षीय पुरूषालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस जुने नाशिकमधील कोरोनबाधितांचा आकडाही वाढू लागला आहे.तसेच पंचवटी परिसरातील राहूलवाडीमध्ये ३२ वर्षीय महिला, दिंडोरीरोडवरील ७१ वर्षीय पुरूष ज्येष्ठ नागरिक, भराडवाडीमध्ये २५ वर्षीय तरूण तर हिरावाडीमधील त्रिमुर्तीनगरमधील ६४ वर्षीय वृध्द पुरूषाचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. पेठरोडवरील २६ वर्षीय युवती, २८वर्षाचा युवक, ३५व ५०वर्षीय महिलांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच पंडीतकॉलनीमध्येही एका ३६ वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सिडकोमधील विजयनगर येथे एका २२वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जेलरोड कॅनॉलरोडवरील ४५वर्षीय पुरूष तर ७२ वर्षीय वृध्द महिला कोरोनाबाधित झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २०९ तर जिल्ह्यात ३८९ अॅक्टिव रुग्ण आहेत. नाशिक ग्रामिणमध्ये ६८ रुग्ण अॅक्टिव आहेत. जिल्ह्यात अद्याप ८९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १४ महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातून ९७३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीसुध्दा गेले आहेत. मालेगावमध्ये सध्या ९६ कोरोनाग्रस्त अॅक्टिव रुग्ण आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकूण १ हजार ४५१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. महापालिका हद्दीतील १०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.