लासलगाव : परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून २० जणांना गंभीर जखमी केले आहे. पायी चालणाऱ्यांवर आणि मोटारसायकलस्वारांच्या अंगावर धावून जात चावा घेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रविवारी आठवडे बाजारामध्ये कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, अनेक लहान मुलांना चावा घेतला आहे. यातील अकरा जणांवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर उर्वरित लोकांना लस उपलब्ध नसल्याने जिल्हारु ग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.रविवारी दिवसभरामध्ये लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळपासून २० जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एंटी रेबीज सिरप संपल्याने काही रुग्णांना नाशिक येथे पाठविण्यात आले आहे.रुग्णांवर लासलगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण आहेर, परिचारिका स्मिता पाटेकर यांनी उपचार केले.
लासलगावी कुत्र्याच्या हल्ल्यात २० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:52 AM