नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांहून अधिकचा काळ उलटल्यानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्णातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. आता शाळा प्रवेशाचे जवळपास सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याने शिक्षण विभागाच्या या कार्यवाहीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्णातील पाच तालुक्यांतील २० अनधिकृत शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली.साधारणत: प्राथमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते. त्यामागील उद्देश हा या पूर्व परवानगी न घेताच सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे हा त्यामागील उद्देश असतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यापूर्वीच अशी अनधिकृत शाळांची यादी १० जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात यादी जाहीर करण्यास ८ आॅगस्टचा मुहूर्त सापडला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मागे रेटा लावून या अनधिकृत शाळांबाबत यादी मागितली होती. अखेर ही माहिती येताच त्यांनी ती जाहीर केली. या २० अनधिकृत शाळांची नावे अशी- दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, अवनखेड (दिंडोरी), ग्लोबल व्हिजन संचलित डिव्हाइन फ्लॉवर मिडियम स्कूल, ननाशी(दिंडोरी), अम्मा भगवान इंग्लिश मिडियम स्कूल, देवगा, न्यू गुरूकुल पब्लिक स्कूल, खेरवाडी (निफाड), न्यू पब्लिक स्कूल, चितेगाव (निफाड), संतुलन पाषाण शाळा दगडखाण, विंचूर (निफाड), गार्गी इंग्लिश स्कूल (निफाड), स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लिश मिडियम स्कूल, विंचूर (निफाड), यशदा इंग्लिश मिडियम स्कूल, माळेगाव, चिदंबरम स्वामी इंग्लिश मिडियम स्कूल (सिन्नर), सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल, तळेगाव (मालेगाव), हिरा इंग्लिश मिडियम स्कूल, माळेगाव, छत्रपती शिवाजी प्रायमरी स्कूल, रावळगाव (मालेगाव), गुरूकुल पब्लिक स्कूल, दापूर (सिन्नर) पूज्य अहल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कंक्राळे (मालेगाव), जनता विद्यालय, आडगाव रेपाळ, जनता विद्यालय, पिंपळगाव लेप, न्यू इंग्लिश स्कूल, सावरगाव अंतर्गत अनकुटे, जनता विद्यालय, अंगणगाव (येवला) आदिंचा अनधिकृत शाळांच्या यादीत समावेश आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील २० प्राथमिक शाळा अनधिकृत
By admin | Published: August 09, 2016 12:35 AM