औंदाणे : हरणबारी येथे मामाच्या गावी शेतीकामात मदत करताना लोखंडी नांगराचा दांडा ११ के.व्ही. विजेच्या तारांना लागल्याने दिनेश काळू चौरे (२२) रा. यशवंतनगर (धांद्री) या आदिवासी तरु णाचा जागीच मृत्यू झाला. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत मंगळवारी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी अधिवेशनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. शासनाने तत्काळ २० हजारांची मदत जाहीर केली. उर्वरित सुमारे पाच लाखांची मदत शासनाकडे प्रस्ताव देऊन मिळणार आहे, अशी माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.११ के.व्ही. वीजवाहिनी शेतातून गेल्याने विद्युत कंपनीच्या वीजतारा गेल्या आहेत. या तारा पूर्ण लोंबकळल्या असून, अवघ्या १० फूट जमिनीपासून अंतर असल्याने तारांचा अंदाज नसल्याने लोखंडी नांगराचा दांडा वीजतारांना लागल्याने दिनेशचा जागीच मृत्यू झाला. वेळोवेळी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीजतारांबाबत सांगूनही दुर्लक्षामुळे हा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.येथील आदिवासी तरु णाचा वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाला आहे. वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करूनही वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने यापुढे घटना घडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.- दीपिका चव्हाण, आमदार बागलाणवीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घरातील सर्व कुटुंबाची जबाबदारी दिनेशवर होती, कर्तबगार मुलाचा मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई व्हावी.- काळू चौरे, दिनेशचे वडील, यशंवतनगर
‘त्या’ तरुणाच्या कुटुंबीयांना २० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:11 PM