लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे आता शंभर आणि पाचशेपर्यंतच्या नोटांना बाजारात मागणी वाढणार असल्याने नाशिकरोडमधील करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईचे काम वाढणार आहे. या ठिकाणी विविध चलनाच्या सुमारे ५२० काेटी नोटांची छपाई केली जाणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली.
२०१६ मध्ये मोदी सरकारने पाचशे व एक हजाराची नोट चलनातून बाद करून दोन हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नाशिकरोड प्रेसला दोन हजारांच्या नोटा छपाईचे काम मिळाले होते. आता पुन्हा नाशिकरोड प्रेसला पाच रुपयांपासून पाचशेपर्यंतच्या नोटा छपाईचे काम देण्यात आले आहे. याशिवाय नेपाळच्या तीनशे कोटी नोटा छपाईचे काम मिळाले आहे.
नोटा छपाईचे काम जोरात सध्या या प्रेसमध्ये दहापासून पाचशे रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यात आता आधुनिक मशिनरी लावण्यात आल्याने छपाईचा वेग वाढला आहे.