कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरो, सामाजिक अंतर पाळावयाच्या नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकताना आढळून आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहे. शहरात आतापर्यंत तब्बल २० हजार लोक मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी न करताना पोलिसांना आढळले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या ‘मास्क हेच औषध’ असे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे; मात्र मास्क वापराबाबत नागरिकांमध्ये लॉकडाऊन शिथिलतेनंतर वेगाने उदासीनता वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळूनच येत नाही, असे अजिबात नाही. यामुळे कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा करणे ‘महाग’ पडू शकते, त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि ‘फिजिकल डिस्टन्स’बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
---इन्फो--
...तर थेट न्यायालयात द्यावी लागेल हजेरी
मास्क न लावताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना पोलिसांच्या तावडीत सापडले, तर मुंबई पोलीस अधिनियम व थेट कलम-१८८नुसार गुन्हा दाखल होऊन संबंधितांना थेट न्यायालयात हजेरी लावण्याची वेळ येऊ शकते. न्यायालयात दंडात्मक शिक्षा सुनावली जाते. यामुळे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरणे चांगलेच महागात पडू शकते.