नाशिक : मार्च एण्डींगच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन मंडळाने केलेल्या पुनर्नियोजनात ग्रामीण भागातील विकासासाठी २१ कोटी निधी उपलब्ध झाला असून, त्यात रस्ते दुरूस्तीसाठी ९ कोटी तर, लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधाऱ्यासाठी ५ कोटी तसेच जनसुविधातंर्गत ७ कोटींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात बुधवारी (दि.३१) बिले जमा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आतापर्यंत लेखा विभागाने १९८.४३ कोटींची बिले ट्रेझरीमध्ये जमा केली आहे.
जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषेदला चालू आर्थिक वर्षाचे नियमित नियतव्यय प्राप्त झाले. बुधवारी ३१ मार्च रोजी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेला पुनर्नियोजनात २०.८४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यात जनसुविधातंर्गत ७.०३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. लघुपाटबंधारे अंतर्गत बंधाऱ्यासाठी ५ कोटी प्राप्त झाला आहे. ३०५४ व ५०५४ या लेखा शिर्षकातंर्गत रस्ते व दुरूस्तीकरिता ८ कोटी ८१ लाखांचा निधी देण्यात आला आहे. निधी उपलब्ध झालेला असताना बिले जमा करण्याचे काम जोरात सुरू होते. पाच दिवसात लेखा विभागाने १९८.४३ कोटींची बिले जमा केलेली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बिले जमा करण्याची मुभा असल्याने रात्री उशीरापर्यंत सुरू होते.