नाशिक : सातपुर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून या गुन्ह्यातील २१ व अन्य पाच असे एकुण २६ बोकडांची सुटका करत ते पोलिसांनी जप्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी, गुदामाचे कुलूप तोडून चोरट्याने गुदामातील ८४ हजार रुपयांचे २१ बोकड चोरुन नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१८) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी इनोव्हा कारमधून (एम.एच०२बीजे २२४५) बोकड लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले होते. पोलीस निरिक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शाोधपथकाला आदेशित करत गुन्ह्याचा छडा लावण्यास सांगितले. पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपासचक्रे फिरविली. पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्यादिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत मोबाईल क्रमांक ट्रेस करत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पथकाने मुंब्रा गाठले. तेथून संशयित आसीफ रशीदउल्ला कुरेशी (३५, रा. खर्डीरोड, मुंब्रा) यास ताब्यात घेतले. पथकाने आसीफ याची कसून चौकशी केली असता कारमालक ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील असल्याचे समजले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सातपूर येथून बोकड चोरल्याची कबुली पोलिासांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे १ लाख ९ हजार रुपये किंमतीचे २६ बोकडही जप्त केले आहेत.