नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त आणि सध्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीने नियुक्तपत्र देऊन एकाची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक तक्रार आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्हॉलमनपदासाठी इतकी रक्कम घेण्यात आल्याची तक्रार संबंधिताने केली असून, त्याची प्राथमिक चौकशी महापालिकेने सुरू केली आहे.
नाशिक महापालिकेत नोकरीच्या आमिषाने आजवर अनेक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. तीन वर्षांपूर्वी आस्थापना विभागातील एका शिपायाने लेखा विभागात अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची भरती केली होती, त्याविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले हेाते. आता तर थेट महापालिकेच्या माजी आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली असून, त्याआधारे फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे यासंदर्भात एका फसवणूक झालेल्या इसमाने तक्रार केली आहे. पाणीपुरवठा विभागात व्हाॅलमनपदासाठी त्याच्याकडून २१ ते २३ लाख रुपये एकाने उकळले आणि त्या बदल्यात २०२० मध्येच नियुक्तीपत्र दिले आहे. त्यावर महापालिकेचे २०१९ मध्ये असलेले आयुक्त राधाकृष्ण गमे यांची डिजिटल स्वाक्षरीदेखील आहे. २९ हजार रुपयांच्या वेतनावर ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून, हे पत्र घेऊन रुजू होण्यासाठी गेल्यानंतर संबंधिताला फसवणूक झाल्याचे लक्षात आले, असा संबंधित उमेदवाराचा दावा आहे. या इसमाने आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांच्याकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने त्यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे.
इन्फो...
व्हॉलमनचे स्पेलिंगही चुकीचे
महापालिकेत भरतीचे बोगस नियुक्तीपत्र ज्या व्यक्तीला मिळाले त्यावर व्हॉलमनचे स्पेलिंगदेखील चुकीचे आहे. डब्ल्यूएडबलएल असे स्पेेलिंग आहे. प्रशासनाने आयटी विभागाकडे डिजिटल स्वाक्षरी तपासणीसाठी पत्र दिले असून, सोमवारी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले.