नाशिक : रविवारी रात्री आडगाव आणि परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र स्पष्ट होऊ शकले नसून नेपाळमध्ये सुरू असलेल्या भूकंपाच्या साखळीचा येथे काहीच संबंध नसल्याचे भूकंपमापन केंद्राच्या प्रमुख चारुलता चौधरी यांनी सांगितले.रविवारी सायंकाळी आडगाव आणि जत्रा हॉटेल परिसरात भूकंपाचे धक्केबसले होते. काही सेकंद बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. नेपाळमध्ये झालेल्या तसेच देशाच्या सीमेवर बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे आधीच धास्ती घेतलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण झाली आणि हे धक्के जाणवताच अनेकांनी संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली. एक ते दोन सेकंद इतका वेळ धक्केबसलेल्या या भूकंपाची तीव्रता केवळ २.१ इतकी नोंदवली गेली. त्यानंतर मात्र धक्केजाणवले नसले तरी नागरिक साशंक होते. रात्रीपासून भूकंपमापन केंद्रात दूरध्वनी करून त्याबद्दल विचारणा केली जात होती; परंतु होणाऱ्या भूकंपाची कोणतीही यंत्रणा विकसित झालेली नसल्याने त्याबद्दलचा कोणताही अंदाज सांगण्यात अधिकृत सूत्रांनी असमर्थता दर्शवली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोणता आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी नाशिकच्या केंद्राने याबाबत ठाणे (भातसा), अक्कलपाडा (धुळे) आणि पैठण (नगर) येथील भूकंपमापन केंद्रांशी संपर्क साधला असून, त्यांच्या यंत्रणेवर झालेली नोंद तपासल्यानंतर केंद्रबिंदू स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागालाही माहिती पुरविण्यात आली असून, त्यानुसार पुढील संशोधन सुरू आहे. (प्रतिनिधी)
२.१ रिश्टर क्षमतेचा धक्का : भूकंप साखळींशी संबंध नाही
By admin | Published: June 02, 2015 12:10 AM