नाशिक : प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून, यात राज्यात शासन मान्यता न घेता तब्बल ६७४ शाळा सुरू झाल्याचे समोर आले आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्याची सूचना राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे २१ शाळांचा समावेश आहे. यात सर्वाधिक बेकायदा तथा अनधिकृत शाळा या नाशिक महापालिका क्षेत्र २ भागात असून, भाग १मध्ये एक शाळा अनधिकृत आहे. तर मालेगाव मनपा क्षेत्रात तीन शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आरटीई कायद्यांतर्गत आता शालेय शिक्षण विभागाच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा उघडल्यास किंवा शिक्षण विभागाने मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्यास अशा संस्थाचालकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यात संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा विचार करता, २१ शाळा अनधिकृत असून, या सर्व शाळांच्या संस्थाचालकांना शिक्षण विभागाच्या कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
तालुकानिहाय अनधिकृत शाळा
देवळा - १
दिंडोरी - १
इगतपुरी - १
कळवण - २
मालेगाव मनपा - ३
नाशिक - ३
नाशिक मनपा एक - १
नाशिक मनपा दोन - ६
निफाड - २
त्र्यंबकेश्वर - १
यादीतील शाळा