लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये दुपारच्या सुमारास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मोठ्या टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला अन् रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू झाले. सर्वत्र हाहाकार उडाला. कोणी ऑक्सिजनवर, तर कोणी व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते, या सर्वांचा श्वास गुदमरायला सुरुवात झाली अन् एकापाठोपाठ अवघ्या दोन तासांत २२ रुग्णांनी आपले प्राण गमावले.ऑक्सिजनच्या मुख्य टाकीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त होऊन गळती सुरू झाली. यावेळी ऑक्सिजनचा टँकरदेखील आलेला होता. या टँकरमधून ऑक्सिजन टाकीमध्ये भरण्यात येणार होता. याच दरम्यान, व्हॉल्व्ह पूर्णत: निकामी होऊन ऑक्सिजन गळती झाल्याने धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झालेला होता. नेत्यांच्या भेटीnदुर्घटनेनंतर सर्वप्रथम जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. nत्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.
पालिका आयुक्त पाऊण तासाने घटनास्थळीnसव्वाबारा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनच्या टाकीला गळती सुरू झाली आणि नातेवाइकांच्या पायाखालची जमीन सरकली. nसर्वत्र मृत्यूचे तांडव अन् नातेवाइकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंतीही हादरल्या. nया भीषण दुर्घटनेच्या वेळी आयुक्त कैलास जाधव हे तब्बल पाऊणतासानंतर रुग्णालयात पोहोचले. nपाऊणवाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयाचा उंबरा चढला अन् बंदी घातली ती पत्रकारांवरच.
कर्ता मुलगा गेल्याने लोखंडे कुटुंबीय हवालदिललोकमत न्यूज नेटवर्कनाशिक रोड : घरातील कर्त्या मुलाला नियतीने हिरावून घेतल्याने जेल रोड येथील लोखंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संदीप हरिभाऊ लोखंडे या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्या नाशकातील कथडा भागातील झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत जेल रोड, भीमनगर बेला डिसूजा रोड येथे राहणारा युवक संदीप हरिभाऊ लोखंडे हा ३८ वर्षांचा युवक मृत्युमुखी पडला. गेल्या तीन दिवसांपासून संदीप हा झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत होता. संदीपचा विजय ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय होता.
व्हेंटिलेटरवरील ११ रुग्ण दगावलेकोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळणे कठीण असताना, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रुग्णांना बेड मिळाले, चाैदा जणांना ऑक्सिजनही मिळाला; पण दुर्दैवाने हेच जिवावर बेतले. ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धावपळ केली, परंतु व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला.
बेड, ऑक्सिजन मिळालेडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५० बेडची क्षमता असताना १५७ रुग्ण दाखल होते. त्यातील १३१ रुग्णांना ऑक्सिजन लावावा लागला होता; तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या रुग्णालयात दाखल ६३ रुग्ण गंभीर होते. मात्र, ऑक्सिजन गळतीची दुर्घटना झाल्यानंतर एकच हलकल्लोळ झाला.
...पण जीव वाचला नाहीमहापालिकेच्या कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी बरीच धावपळ करून रुग्ण वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तरीही २२ जणांचा बळी गेला. यात व्हेंटिलेटरवरील १५ पैकी ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक पालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे वर्षभरापासूनच कोविड रुग्णालय म्हणून राखीव ठेवण्यात आले होते.